विसर्जनानंतर 2754 मेट्रिक टन पीओपीचे संकलन, रिसायकलिंग आणि पुनर्वापरासाठी पालिकेने मागवले अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई महापालिकेने तब्बल 2,754 मेट्रिक टन विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याचे संकलन केले आहे. हे संकलित पीओपी साहित्य मुलुंड येथील केंद्रात एकत्रित करण्यात आले आहे. त्यावर आता शास्त्रीय आणि पर्यावरणपूरक पद्धतीने रिसायकलिंग करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या कामासाठी पालिकेने इच्छुक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.

महापालिकेने 16 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत विसर्जित मूर्ती आणि त्यासोबतचे विसर्जनोत्तर साहित्य गोळा केले आहे. त्यासाठी 707 वाहन फेऱ्यांचा वापर करून एपूण 2,754.85 मेट्रिक टन वजनाचे साहित्य तात्पुरत्या साठवणूक केंद्रापर्यंत पोहोचविले आहे.

विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 131 वाहन फेऱ्यांद्वारे 510.92 मेट्रिक टन साहित्य वाहून नेण्यात आले. विभागनिहाय आकडेवारीनुसार, के/पश्चिम विभागातून सर्वाधिक 314.82 मेट्रिक टन, एस विभागातून 253.58 मेट्रिक टन आणि डी विभागातून 249.43 मेट्रिक टन साहित्य वाहून नेण्यात आले, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ञ समितीच्या शिफारशींनंतर पालिकेने कार्यवाही केली आहे.