
रेल्वे अपघातातील मृत प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट सापडले नाही, म्हणून भरपाईचा दावा फेटाळता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गुजरातमधील या प्रकरणात न्यायालयाने धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आईवडिलांना देण्यात आलेली 8 लाख रुपयांची भरपाई न्यायालयाने बहाल केली. गुजरात उच्च न्यायालयाने ही भरपाई रद्द करण्याचा आदेश दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.
न्या. उज्जल भुयान आणि न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. महेशभाई हे तिकीट घेऊन प्रवास करत होते, असे त्यांच्या वडिलांनी शपथपत्रात म्हटले होते. मात्र, ही बाब खोटी असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी रेल्वेची होती, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 27 सप्टेंबर 2017 रोजी अहमदाबादमार्गे सूरतच्या दिशेने सामान्य वर्गाच्या डब्यातून प्रवास करणारे महेशभाई हे अचानक खाली पडले होते. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. सुमारे महिनाभर उपचारानंतर 31 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. रेल्वे न्यायाधिकरणाने 2022 मध्ये महेशभाई यांच्या मृत्यूप्रकरणी दावा मान्य करत त्यांच्या आईवडिलांना भरपाई मंजूर केली होती. मात्र, त्यांच्याकडे प्रवासाचे तिकीट सापडले नाही, म्हणून हा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.




























































