रासायनिक कारखान्याचा तपास करा, दोषींवर कठोर कारवाई करा; शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक शौचालयात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. ही घटना प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी. यामागे विषारी वायू अथवा रासायनिक पदार्थांचा संबंध आहे का, याचा तातडीने आणि कोणतीही माहिती दडपून न ठेवता वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक अंकित प्रभू उपस्थित होते. शौचालयाच्या शेजारी रासायनिक पदार्थांचा वापर करणारा कारखाना असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यात घटनेच्या वेळी कोणते रसायन वापरले जात होते, कोणती प्रक्रिया सुरू होती आणि त्यातून धूर अथवा विषारी वायू बाहेर पडला होता का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या कारखान्याकडे पालिका किंवा अग्निशमन दल व इतर संबंधित प्राधिकरणांच्या आवश्यक परवानग्या आहेत का, रासायनिक पदार्थ हाताळण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आहे का आणि नियमांचे पालन केले जात आहे का, याची तातडीने तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.