
पठार भागातील खंडेरायवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार गुरुवारी (दि. 24) समोर आला. शेतमजुरीसाठी गेलेल्या आदिवासी महिला व तिच्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना मारुती मंदिरात बोलावून हॉकी स्टीक, लोखंडी गज व तलवारीने बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला.
मारहाण करून न थांबता जखमींना विष्ठा चारण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर लघुशंका करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या अमानुष प्रकाराने पठार भाग हादरला असून, घारगाव पोलिसांनी 12 निष्पन्न आरोपींसह सहा ते सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध शनिवारी (दि. 26) रात्री गुन्हा दाखल केला आहे.
धनंजय वाळुंज, प्रतीक वाळुंज, अभिषेक वाळुंज, शैलेश बोऱहाडे, विदेश ढेरंगे, भानुदास वाळुंज, बाळू उंडे, संजय ढेरंगे, नीलेश ढेरंगे, जीवन वाळुंज, गणेश ढेरंगे, सतीश वाळुंज यांच्यासह सहा ते सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी (दि. 24) सकाळी टोमॅटो तोडण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय महिलेची साडी ओढून तिला स्पर्श केल्याचा, तसेच आईला सोडवण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. यावेळी महिलेच्या गळ्यातील 35 हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार महिलेच्या नातेवाईकांना समजल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पुरुषांना प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली मारुती मंदिरात बोलावण्यात आले. तेथे जमावानेच हल्ला चढवल्याचा आरोप आहे.
सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत मारहाणीचा हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींच्या दुचाकींवर दगड टाकून नुकसान करण्यात आले, मजुरीचे पैसे बळजबरीने काढून घेतले आणि गाडीखाली घालून मारून टाका, अशा धमक्या दिल्याचा आरोप आहे. जखमी बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना ताब्यात घेतले.



























































