
‘एकमेकांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. प्रत्येकाचा सन्मान राखला पाहिजे. ठेवीदार आणि कर्जदारांचे हित लक्षात घेऊन बँक बिनविरोध झाली तर चांगलेच. मात्र, कोणी निवडणूक प्रतिष्ठेची किंवा इगोची केली तर निवडणूक होईल,’ असा इशारा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नाव न घेता दिला आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठsचा मुद्दा आडवा आला, तर संघर्ष अटळ आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच जिह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडून प्रयत्न होत असतानाच एकमेकांवर कुरघोडी आणि प्रतिष्ठsच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता थेट सूचक इशारा दिला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यामुळेही राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ‘मी जिल्हा बँकेचा चेअरमन होण्याचा नाही, तर जागतिक बँकेचा चेअरमन होण्याचा विचार करत आहे. माझा कोणाला त्रास होतो आहे किंवा मला कोणाचा त्रास होतो आहे, हे मला माहीत नाही,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर थेट नाव न घेता राम शिंदे यांनी दिलेले उत्तर जिह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
‘जिल्हा बँक ही कोणाच्या व्यक्तिगत राजकीय महत्त्वाकांक्षेची संस्था नसून, शेतकरी, ठेवीदार आणि कर्जदारांच्या हिताशी जोडलेली महत्त्वाची सहकारी संस्था आहे,’ असे सांगत शिंदे यांनी बँकेच्या इतिहासाची आठवण करून दिली. ‘आपल्या पूर्वजांनी ही बँक चांगल्या पद्धतीने सांभाळली. एकेकाळी या बँकेला आशिया खंडात क्रमांक एकचे नामांकन मिळाले होते,’ असे ते म्हणाले. त्यामुळे बँकेची प्रतिष्ठा आणि आर्थिक विश्वासार्हता अबाधित ठेवणे हे राजकीय कुरघोडीपेक्षा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचा सन्मान केला पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. बँकेच्या निवडणुकीत सर्व राजकीय नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर शेतकरी आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण होऊ शकते. प्रत्येकाचा मानसन्मान ठेवला पाहिजे. जिरवाजिरवीचे राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. बँकेचे हित सर्वांत महत्त्वाचे आहे, असे सांगत कोणी निवडणूक प्रतिष्ठsचा विषय केला तर निवडणूक होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.



























































