
दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी रविवारी एका तरुणाला कानफटात मारली. नव्याने बनवण्यात आलेला एक रस्ता लोकांनी हाताने उखडून दाखवल्यामुळे प्रवेश वर्मा यांना राग आला व त्यांनी त्या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
”मोदीजींची भाजप जनतेच्या प्रश्नांना इतकी घाबरली आहे की “नाराज फुफा”, “दिमागी नक्षल” आणि “आंदोलनजीवी” यांसारखे अपशब्दही आता फिके पडत आहेत. हुकूमशहा भाजप-आरएसएस थेट हिंसेवर उतरली आहे. दिल्लीचे मंत्री तरुणाच्या थोबाडीत मारत आहेत. अमित शाह यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर तरुणांवर लाठीचार्ज झाला. त्याआधी शेतकऱ्यांना मोदींच्या मंत्र्याच्या मुलाने वाहनाखाली चिरडले. केंद्रीय मंत्र्याने “गोली मारो, ___” म्हटले. शेतकरी आंदोलनात रबर बुलेट चालवण्यात आल्या, ७५० शेतकऱ्यांचा जीव गेला. गुजरातच्या उनामध्ये दलितांवर चाबकाचे फटके ओढले गेले, पण न्याय अद्याप मिळालेला नाही. सत्तेचा अहंकार जेव्हा शिगेला पोहोचतो, तेव्हा जनतेचे अपमान करणे ही एक सवय बनते. भाजप-आरएसएसवाले केवळ धोरणांतूनच लोकशाही चिरडत नाहीत, तर आता लाठ्या-काठ्या उगारून जनतेवर थेट प्रहार करत आहेत”, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.























































