
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयातून नवजात बालकांसाठीच्या एका विशेष योजनेचा शुभारंभ केला. ‘थाई मामन थंगा मोथिरम थिट्टम’ (मामाची सोन्याची अंगठी योजना) असे या योजनेचे नाव असून, याअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे.
योजनेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री विजय यांनी नवजात बालकांना स्वतः हातात घेऊन त्यांच्या पालकांकडे सोन्याच्या अंगठ्या सुपूर्द केल्या. सरकारी रुग्णालयांमध्ये बालकांच्या जन्माचा आनंद साजरा करणे आणि आरोग्य यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
काय आहे ‘१ ग्रॅम सोन्याची अंगठी’ योजना?
– या योजनेअंतर्गत पात्र नवजात बालकाला २२ कॅरेट सोन्याची १ ग्रॅम वजनाची अंगठी दिली जाईल.
– प्रत्येक अंगठीवर एक स्वतंत्र Unique Serial Number असेल तसेच ती अंगठी टॅम्पर-प्रूफ पॅकिंगमध्ये दिली जाईल.
– योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने १ लाख २८ हजार सोन्याच्या अंगठ्यांची खरेदी पूर्ण केली आहे.
– तामिळनाडू सरकारने या लोककल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल ₹७५५.८३ कोटी रुपयांच्या वार्षिक निधीची तरतूद केली आहे.























































