
राज्य शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. मात्र या यादीत शहापूरच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीतून वगळल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना निवेदन देत मदत जाहीर करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला.
शहापूर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात दोन ते तीन वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतातील उभी पिके, बियाणे, सुपीक माती तसेच शेतीसाठी लागणारे साहित्य वाहून गेले. अनेक शेतजमिनी दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीची संधीही मिळाली नाही. त्यातच काही भागांत खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने भात पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी भातशेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे अतिवृष्टी, पुराचे पाणी आणि पावसातील खंड यांचा थेट परिणाम भात उत्पादनावर होत आहे. सध्या भात पीक पोगीच्या अवस्थेत असताना पाऊस लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
स्वतंत्र अहवाल सादर करा
शहापूर तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा स्वतंत्र अहवाल तहसीलदारांनी शासनाकडे सादर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी केली आहे. शासनाने शहापूर तालुक्याचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समावेश करून बाधित शेतकऱ्यांना आवश्यक त्या सवलती व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शहापूरमधील पावसाळी परिस्थितीचा आढावा केवळ वार्षिक पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून न घेता पावसाचे वितरण, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, जमिनीतील ओलावा, जलसाठ्यांची स्थिती आणि आगामी हंगामातील पाण्याची उपलब्धता या सर्व बाबींचा एकत्रित विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.




























































