
महिला क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अमर क्रिकेटर्सतर्फे ‘अमर क्रिकेटर्स इन्व्हिटेशनल कॉर्पोरेट महिला टी-20 लीग’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान कांदिवली येथील एमसीए सचिन तेंडुलकर जिमखाना येथे होणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघातील आणि मुंबईच्या सानिका चाळके व हर्ली गाला, तसेच हिंदुस्थान ‘अ’ संघातील फातिमा जाफर, मनाली दक्षिणी आणि वृशाली भगत यांच्यासह मुंबईची तन्वी गावडे आदी युवा क्रिकेटपटूंचा सहभाग असेल.
स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून सर्व्हिफाय, आरआर ग्रुप, विश्राम वेल्थ, इम्प्रिंट डिस्प्लेज, जॅझ स्क्वेअर आणि पार्श्व बुलियन हे संघ मैदानात उतरतील. एमसीएकडून खेळाडूंचे वाटप करण्यात येणार असून प्रत्येक संघात किमान दोन 19 वर्षांखालील आणि दोन 23 वर्षांखालील खेळाडू असतील. विजेत्या संघाला एक लाख, तर उपविजेत्या संघाला 50 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला प्रत्येकी 10 हजार, तर ‘वुमन ऑफ द सिरीज’ला 15 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. प्रत्येक खेळाडूला पाच हजार रुपये सहभाग भत्ता मिळणार आहे. अमर क्रिकेटर्सचे अध्यक्ष व एमसीए अपेक्स कौन्सिलचे सदस्य भूषण पाटील यांनी ही माहिती दिली. एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीही महिला क्रिकेटपटूंना समान संधी देण्याच्या या उपक्रमाचे स्वागत केले.




























































