
आतापर्यंत आपण एखादा कामासंदर्भात प्रश्न पडल्यास तो प्रश्न एआयला विचारायचो, त्याचं उत्तर घ्यायचं आणि पुढचं काम पुन्हा त्याला सांगायचं… पण आता हे चित्र बदलणार आहे. OpenAIने असा एआय एजंट सादर केला आहे, जो एकदा काम सोपवल्यानंतर पुढची अनेक पावलं स्वतः ठरवून काम सुरू ठेवू शकतो. या नव्या एआय एजंटचं नाव आहे ‘डॉट्स’.
‘डॉट्स’ची खासियत म्हणजे त्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कमांड देत बसण्याची गरज नाही. तुम्ही त्याला एखादं काम सांगितलं की, ते पूर्ण करण्यासाठी पुढे काय करायचं, कोणती माहिती शोधायची आणि कोणत्या टप्प्यावर पुढे जायचं, हे तो स्वतः ठरवू शकतो. विशेष म्हणजे, OpenAIच्या माहितीनुसार प्रत्येक ‘डॉट’ला स्वतःचा क्लाउड कॉम्प्युटर आणि ब्राउझर मिळतो. त्यामुळे तो विविध वेबसाइट्स आणि कनेक्टेड अॅप्सचा वापर करून एखाद्या प्रोजेक्टवर काम करू शकतो. एवढंच नाही, तर तुम्ही ChatGPT बंद केलं तरी ‘डॉट्स’ बॅकग्राउंडमध्ये काम सुरू ठेवू शकतो.
समजा, तुम्ही एखाद्या रिपोर्टसाठी सतत बदलणाऱ्या आकडेवारीवर काम करत आहात. अशावेळी ‘डॉट्स’ नवीन माहिती तपासू शकतो, उपलब्ध डेटाचं विश्लेषण करू शकतो आणि रिपोर्टमधील माहिती अपडेट करू शकतो. मात्र, एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी तुमची मंजुरी आवश्यक असेल, तर तो तिथे थांबून तुमच्याशी संपर्क साधेल. कंटेंट क्रिएटर्ससाठीही हा एआय एजंट कामाचा ठरू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या मुलाखतीची ट्रान्सक्रिप्ट दिल्यानंतर त्यातून महत्त्वाचे मुद्दे शोधणे, शो नोट्स तयार करणे आणि सोशल मीडिया पोस्टचे ड्राफ्ट बनवणे अशी कामं ‘डॉट्स’ करू शकतो.
OpenAIच्या म्हणण्यानुसार, ‘डॉट्स’ला 4 हजारांहून अधिक अॅप्सशी जोडण्याची क्षमता आहे. कोणत्या अॅप्सना प्रवेश द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या परवानग्या द्यायच्या, हे यूजर ठरवू शकतो. संवेदनशील कामांसाठी यूजरची मंजुरी घेण्याची सुविधाही ठेवण्यात आली आहे. याशिवाय ‘कस्टम रुल्स’च्या माध्यमातून ‘डॉट्स’ने कशाप्रकारे काम करावं, याचे नियमही यूजर ठरवू शकतो.
मेटाच्या ‘Muse’ AI एजंटनंतर आता OpenAIने ‘डॉट्स’ मैदानात उतरवल्याने एआयच्या शर्यतीला नवा ट्विस्ट मिळाला आहे. आतापर्यंत ‘कोण चांगलं उत्तर देतं?’ यावरून सुरू असलेली स्पर्धा आता ‘कोण तुमचं काम करून देतं?’इथपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, एआय आता फक्त उत्तर देणारा साथीदार न राहता तुमच्या कामाचा ‘डिजिटल असिस्टंट’ बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
























































