मुलानं डॉक्टर व्हावं अशी वडिलांची इच्छा, पण नशिबात वेगळंच होतं; शूज उसने घेऊन खेळणाऱ्या नबीची टीम इंडियात वर्णी, विंडिजविरुद्ध पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाने चांगले शिकून डॉक्टर व्हावे आणि लोकांचे उपचार करावे अशी वडिलांची इच्छा होती. पण नियतीला हे मान्य नव्हते आणि नशिबाने त्या मुलाच्या हातात स्टेथोस्कोप ऐवजी क्रिकेटचा चेंडू आला. लाल-पांढऱ्या चेंडूने फलंदाजांच्या यष्ट्या उडवणाऱ्या आणि कधीकाळी मित्राकडून उसने स्पाईक शूज घेऊन क्रिकेट खेळणाऱ्या बारामुल्लाच्या आकिब नबी याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. रणजी स्पर्धेत भेदक गोलंदाजी करत देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या आकिब नबी याने वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघात गुवाहाटीमध्ये दुसरा वन डे सामना सुरू आहे. या लढतीत नितीश कुमार याला वगळून जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याला हिंदुस्थानच्या अंतिम 11 संघात स्थान देण्यात आले. टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल याच्या हस्ते आकिब नबीला कॅप देण्यात आली. विशेष म्हणजे टीम इंडियाकडून पदार्पण करणारा नबी जम्मू-कश्मीरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

कोण आहे आकिब नबी?

आकिब नबी याचा जन्म 4 नोव्हेंबर 1996 रोजी जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला येथे झाला. आकिब याचे वडील शिक्षक असून मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र आकिबने स्टेथोस्कोप ऐवजी क्रिकेटचा चेंडू हातात घेतला. अभ्यास करावा म्हणून खोलीत बंद केले जात असतानाही तो खिडकीतून पसार व्हायचा आणि क्रिकेट खेळायचा. कधीकाळी क्रिकेट खेळण्यासाठी शूज घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मित्राकडून उसने स्पाईक शूज घेऊन तो क्रिकेट खेळायला. पण त्याच्या याच आवडीमुळे आज क्रिकेट जगतात तो ‘बारामुल्ला एक्सप्रेस’ नावाने ओळखला जातो.

आकिब नबी याने 2018 मध्ये जम्मू-काश्मीरकडून विजय हजारे ट्रॉफी खेळताना लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्ण केले. यानंतर 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि जानेवारी 2020 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. सुरुवातीपासून त्याने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. 2024-25 च्या रणजी हंगामामध्ये त्याने 44 विकेट घेतल्या आणि 2025-26 च्या हंगामामध्ये 60 विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार कामगिरीला इतर खेळाडूंचीही साथ लाभली आणि जम्मू-कश्मीरने पहिल्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले.

आकिब गोलंदाजीसह तळाला येऊन चांगली फलंदाजीही करतो. विजय हजार ट्रॉफीमध्ये त्याने हैदराबादविरुद्ध 82 चेंडूत नाबाद 114 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सने 8.40 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडलेल्या नबीने आता टीम इंडियाकडून पदार्पण केले आहे. त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.