
हिंदुस्थानी तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या पथकाने अरबी समुद्रातून मुंबईकडे निघालेल्या एका इराणी नौकेची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल 546 किलोचे अमली पदार्थ आढळून आले. या नौकेत मेथॅम्फेटामाइन आणि हेरॉईनचा समावेश असून त्याची किंमत तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या पथकाने ही कारवाई अरबी समुद्रातील लक्षद्वीपजवळ केली. या नौकेत असलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अरबी समुद्रात मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे, अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने समुद्र आणि हवेतून देखरेख केली. लक्षद्वीपच्या पश्चिमेला संशयित नौका अडवून तिची झडती घेण्यात आली. नौका, चालक दल आणि अमली पदार्थांना सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत आणण्यात आले आहे, जिथे चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे समुद्री मार्गाने होणाऱया आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसणार आहे.


























































