ज्ञानेश कुमार चोर, दरोडेखोर; ममता बॅनर्जींचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार चोर, दरोडेखोर आहेत. त्यांनी मतचोरी केली. ईव्हीएम मशीन हायजॅक केले, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स जाळली. मतमोजणीत मोठे फेरफार केले, असा असा संताप व्यक्त करत तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भ्रष्ट आणि कारभारावर जोरदार हल्ला चढवला. आमची ‘इंडिया’ आघाडी एकसाथ आहे. भारतात मतचोरीचा महाघोटाळा झाला आहे. या महाघोटाळय़ामुळे जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राहुल गांधींनी बिहारमध्ये मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. मतचोरी करून भाजपने हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकल्या. बंगालमध्ये तर लूट केली. निवडणूक आयोगाकडे मी गेले होते, सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र आता तर सगळे समोर आले असून ज्ञानेश कुमार चोर आहेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

संपूर्ण देशात 13 कोटी मतं चोरली

भाजप म्हणते आम्ही जिंकलो आहोत, मग ज्ञानेश कुमारांनी मतचोरी का केली?, ईव्हीएम मशीन्स मॅनेज का केली?, त्यांनी ईव्हीएम मशीन्स का जाळली?, शिवा खन्ना कोण आहे? एक सॉफ्टवेअर बनवले आणि मतं लुटली. बंगालमध्ये भाजपने 92 लाख मतं लुटली. संपूर्ण देशात 13 कोटी मतं चोरली आहेत. सगळं काही निवडणूक आयोगाच्या संगनमताने झाल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू

जर लोकांनी दिलेल्या मतांचीच चोरी होत असेल तर मग संविधानाचं काय होणार? देशाला काय दिशा मिळणार? जर ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी, लोकांची सुरक्षा तसंच मतांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. हे आंदोलन खूप तीव्र होईल. जमिनीपासून आकाशापर्यंत आम्ही आमचा आवाज पोहचवू, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.