धारावी पुनर्विकासात कुर्ल्यातील 477 झाडांवर कुऱ्हाड; 1,682 झाडे पुनर्स्थापित करणार, पालिकेचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवरील 477 झाडांवर पालिका कुऱ्हाड चालवण्याच्या तयारीत आहे. याबाबत बुधवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत लेखी स्वरुपात या प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदवा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

धारावीचा पुनर्विकास अदानी नवभारत मेगा डेव्हलपर्स या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. धारावीतील पात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करण्यात येणार आहे तर अपात्र रहिवाशांचे कुर्ला, मुलुंड, मालाड आदी ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला पूर्व येथील मदर डेअरीची जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यानुसार, इमारती उभारण्यासाठी मदर डेअरीच्या जागेवरील 477 झाडे तोडण्यात येणार असून, 1,682 झाडे पुनर्स्थापित करण्यात येणार असल्याचा दावा मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

प्रस्तावित विकासकामामुळे बाधित होणाऱया झाडांची पाहणी करून त्यापैकी झाडे काढणे अथवा पुनर्स्थापित करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. हरकती सूचना प्राप्त झाल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयातील कार्यालयात सुनावणी होणार आहे.