
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असणाऱया पाचही टोल नाक्यांवरील पथकर दरात 15 ते 35 रुपयांची वाढ केली आहे. गुरुवार 1 ऑक्टोबरपासून वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर टोल नाक्यांवर मिनी बस, एल.सी.व्ही. वाहनांसाठी 90 रुपये, ट्रक, बससाठी 180 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 225 रुपये पथकर आकारण्यास सुरुवात होणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करून मुंबईकरांचा प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबईत 55 उड्डाणपूल बांधण्यात आले. यासाठी आलेला खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर अशा पाच टोल नाक्यांची उभारणी करून पथकर वसुली करण्यात येत आहे. 2027 पर्यंत ही पथकर वसुली सुरू राहणार आहे.
राज्य सरकारने ऑक्टोबर 2024मध्ये हलक्या वाहनांना, बेस्ट बस, एसटी आणि शालेय वाहनांना पथकर माफी दिल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी मिनी बस, एल.सी.व्ही. वाहने, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना पथकर लागू आहे. दर तीन वर्षांनी पथकर दरांमध्ये एमएसआरडीसीकडून वाढ केली जाते. त्यानुसार 2023मध्ये पथकर दरात वाढ झाली होती. तर आता तीन वर्षांनंतर एमएसआरडीसीकडून पथकर दरात 15 ते 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अशी होणार टोल वसुली
गाडय़ांचे प्रकार जुना टोल नवीन टोल
मिनी बस, एल.सी.व्ही. 75 रुपये 90 रुपये
ट्रक, बस 150 रुपये 180 रुपये
अवजड वाहने 190 रुपये 225 रुपये





























































