‘बँकांविषयी सर्वकाही’ पुस्तकाचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर लिखित ‘बँकांविषयी सर्वकाही’ या पुस्तकाच्या तीन भागांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे अनास्कर यांनी विविध वर्तमानपत्रांतून प्रश्नोत्तराच्या स्वरुपात वाचकांशी साधलेल्या संवादांचे संकलन आहे.

बँकिंगची कार्यप्रणाली, रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे व नियम, सहकारी बँकिंगचे कायदे, परिपत्रके, सर्वोच्च न्यायालय व अनेक विविध न्यायालयांमधील निकालांचा संदर्भ या पुस्तकात वाचायला मिळतात. जामीनदार, कर्जदार, ठेवी याविषयी ग्राहकांच्या मनातील शंका या पुस्तकातून दूर होतील, असा विश्वास अनास्कर यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अनास्कर यांचे कौतुक केले. ‘कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राखण्यासाठी सध्याच्या काळात बँकिंगचे ज्ञान आवश्यक आहे. अशा काळात अनास्कर करत असलेले बँकिंग साक्षरतेचे काम महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या सामाजिक कार्यात सातत्य राखले आहे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.