मराठवाड्याचे दुष्काळाने वाटोळे केले; कर्ज कसे फेडायचे… पोट भरायचे कसे ! 49 लाख हेक्टरवरील खरीपाचे वाळवंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाने केलेल्या दगाबाजीमुळे मराठवाड्यातील 49 लाख हेक्टरवरील खरिपाचे वाळवंट झाले असून 23 लाख हेक्टरवरील रब्बीचा एक दाणाही येण्याची खात्री नाही. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही अन् हाताला काम नाही! लेकी उजवायच्या कशा, कर्ज फेडायचे कसे आणि पोट भरायचे कसे… या प्रश्नांनी जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना आता मरण जवळचे वाटत आहे. गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

मराठवाड्यात खरिपाचे क्षेत्र साधारण 49.72 लाख हेक्टर एवढे आहे. त्यात जवळपास 23 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते, तर 15 लाख हेक्टरवर कापूस घेतला जातो. उर्वरित क्षेत्रात मका, तूर, मूग, उडीद, बाजरी घेतली जाते. पाऊसच नसल्यामुळे सोयाबीन वाळून गेले आहे. कापूस खुरटला असून त्याला वेगवेगळय़ा रोगांनी वेढले आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. परतीच्या पावसाच्या भरवशावर रब्बीचा हंगाम घेतला जातो. पण परतीचा पाऊसही बरसला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची आशाही मावळली आहे.

पिके करपली, विहिरी आटल्या

-जूनमध्ये बरा पाऊस पडला. मात्र त्यानंतर पावसाने अधूनमधून हजेरी लावली. ऑगस्ट, सप्टेंबर तर कोरडाच गेला. जमिनीतील ओलीच्या आधारावर कसाबसा तरलेल्या खरीपाच्या हंगामातील पिके पावसाच्या ओढीमुळे करपून गेली आहेत. विहिरीतील पाणीही आटले आहे.

-मराठवाड्यातील पाच जिल्हय़ांची तहान भागवणारे जायकवाडी उधारीवर मालामाल झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा थेंबही पडला नाही, परंतु वरच्या भागातून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडीत 80 टक्के पाणीसाठा आहे. मात्र मराठवाड्यातील मांजरा, तेरणा, सीना कोळेगाव, निम्न दुधनासह सर्व लहानमोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

जल अर्पण कार्यक्रमासाठी गावच सापडेना

स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारने बीड जिह्यातील 480 गावात दोन हजार कोटी रुपये खर्च करून जलजीवन योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वतीने सेवा संकल्प अभियान राबवण्यासाठी जिल्हाभरातून एक गाव निवडायचे आणि त्या गावामध्ये जल अर्पण उपक्रम राबवायचा आहे. 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी गाव शोधताना जिल्हा प्रशासनाच्या तोंडाला फेस आला. कारण दोन हजार कोटी कागदोपत्री खर्च झालेत, पण प्रत्यक्षात काम कोणत्याही गावात झालेले नाही. अखेर 480 गावांचा फेरफटका मारल्यानंतर वडगाव येथे थोडेफार काम झाल्याचे दिसून आले.