भीमसैनिक संघटनेची शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक, महापालिकेच्या शालेय दैनंदिनीतून डॉ. आंबेडकरांना का वगळले? किशोरी पेडणेकर यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या दैनंदिनी पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र वगळल्यामुळे संतापलेल्या भीमसैनिकांनी आज विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी पेडणेकर यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव का वगळले? असा जाब शिक्षण अधिकारी डी. एन. किरतकुडवे यांना विचारला. त्यामुळे भांबवलेल्या किरतकुडवे यांनी यासंदर्भात अहवाल तयार करून शिक्षण समिती अध्यक्षांना देणार असल्याचे तसेच शिल्लक राहिलेल्या पुस्तिकेचे वाटप पुन्हा करणार नसल्याचे आश्वासन दिले.

शेकडो भीमसैनिकांनी करी रोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देत किरतकुडवे यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे घाबरलेल्या किरतकुडवे यांनी मोघम उत्तर देत स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यावर यासंदर्भातील अहवाल तयार करून तो शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांना सादर करणार असल्याचे किरतकुडवे यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नगरसेविका माधुरी मांजरेकर यांच्यासह भीमसैनिक संघटनेचे प्रतिनिधी सुशांत दोडमणी, प्रशांत जाधव, स्वप्निल कदम, जितेंद्र कांबळे, राजेश भोजने, प्रशांत खंडागळे यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते.