Nanded News – ज्येष्ठ समाज सुधारक माधवराव पाटील शेळगांवकर यांचे निधन; स्वच्छतादूत काळाच्या पडद्याआड …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष्यभर सामाजिक समतेची मूल्य जोपासत मानवतावादी विचारांचे अधिष्ठाण समृद्ध करणारे ज्येष्ठ समाज सुधारक तथा महाराष्ट्र राज्य ग्रामस्वच्छता समितीचे प्रथम अध्यक्ष माधवराव पाटील शेळगांवकर (८२) यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी (30 नोव्हेंबर 2026) रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली असून ग्रामीण जनतेच्या उन्नतीसाठी समर्पित सेवाकार्य करणारे खरेखूरे लोकवैभव निमाल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मुलमंत्र घेऊन सबंध महाराष्ट्रातील गावखेडी पालथी घालणारे माधवराव पाटील शेळगांवकर हे गावं, शेतीभाती, शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक यांचे प्रश्न घेवून लढणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून सुपरिचित होते. सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात त्यांचे सातत्यपूर्ण कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असेच होते.

निर्मल ग्राम, हागणदारी मुक्त गांव, तंटामुक्ती अभियान, पर्यावरण समृद्धी मोहीम, ग्रामसमृद्धी अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान याद्वारे उल्लेखनीय विकासकार्य राबवत माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेळगाव गौरीची राष्ट्रीय पातळीवरील झालेली आदर्शग्राम, ही ओळख नांदेड जिल्ह्यासाठी कौतुकाची बाब ठरली होती.

शेतकरी आंदोलनात दोन वेळा तुरुंगवास भोगलेले माधवराव पाटील गांवखेड्याच्या प्रगतीसाठी प्रचंड क्रियाशील व आग्रही असे व्यक्तिमत्व होते. सामाजिक समता, बंधुभाव व मानवतेचा विचार घराघरात रुजविण्यासाठी त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वातून प्रचंड जनप्रबोधनाचे कार्य अविरत केले.

शेळगाव गौरीचे सरपंच, मार्केट कमिटी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पणन संचालक आदी पदे भूषविणार्‍या माधवराव पाटील शेळगांवकर यांना सामाजिक समता पुरस्कार, गुरुरत्न पुरस्कार, कुसुमताई चव्हाण पुरस्कार, ग्रामभूषण पुरस्कार, मराठा भूषण पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार आदी मान सन्मान लाभले होते.