डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, रमेश म्हात्रेला 5 ऑक्टोबरआधी शरण येण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला सर्वोच्च न्यायालयाने 5 ऑक्टोबरपूर्वी शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र आदेशाची प्रत होत नसल्याने वकील आणि पोलीस संभ्रमात होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची ही प्रत गुरुवारी प्रत प्राप्त झाली.

रमेश म्हात्रे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जुलै महिन्यात डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात परिचारिकांसह डॉक्टरांवर हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच म्हात्रेला अटक झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने काही अटींवर म्हात्रेला जामीन मंजूर केला होता. मात्र या अटी जाचक असल्याचे सांगत म्हात्रेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, राज्य सरकारनेही स्वतंत्र याचिका दाखल करत म्हात्रेच्या जामिनाला आव्हान दिले होते.

या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने म्हात्रेचा जामीन रद्द करत वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही, असे कडक शब्दांत सुनावले होते.