
कोल्हापूर-पेठ वडगाव रस्त्यावरील गणपती मंदिर कमानीजवळ आज दुपारी टेम्पोच्या चाकाखाली चिरडून एका महाविद्यालयीन तरुणीला मृत्यू झाला. मेहक दीपक चावला (वय 23, रा. गांधीनगर, ता. करवीर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहक चावला ही पेठ वडगाव येथील माने फार्मसी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे आज दुपारी ती आपल्या मोपेडवरून कॉलेजसाठी घरून निघाली होती. पेठ वडगाव शहराच्या कमानीजवळ आली असता, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱया भरधाव टेम्पोने तिच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की मेहक थेट टेम्पोच्या चाकाखाली आली. टेम्पोचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीच्या कॉलेज ओळखपत्रवरून पोलिसांनी तातडीने तिच्या वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.



























































