
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली कार रस्त्यालगतच्या भल्यामोठ्या दगडावर आदळली. यात कारमधील तिघे प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळी येथून रत्नागिरीच्या दिशेने निघालेली फॉक्सवॅगन कार गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ पोहोचली असता हा अपघात घडला. दगडाला बसलेली धडक इतकी तीव्र होती की कारचे तीन टायर्स जागीच फुटले आणि गाडी रस्त्यावरच उलटली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना कारमधून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.



























































