
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये हिंदुस्थानला कुस्तीत पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. पुरूषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुजीत कलकल याने अविश्वसनीय विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. शुक्रवारी झालेल्या अंतिम लढतीत सुजीत एका क्षणा 2-9 असा एकूण 7 गुणांनी पिछाडीवर होता. मात्र यानंतर सुजीतने सलग 8 गुणांची कमाई करत अशक्य वाटणारा विजय खेचून आणला.
अंतिम सामन्यात सुजीतपुढे ताजिकिस्तानच्या अब्दुलमझिद कुडियेव याचे आव्हान होते. अब्दुलमझिद कुडियेव ऑलिम्पिदक पदक विजेता असल्याने सुजीतवर चांगलाच दबाव होता. याचा फायदा घेत कुडियेव याने आक्रमक खेळ करत एकामागोमाग एक गुण घेतले आणि आघाडी 2-9 अशी वाढवली. सामना हातचा गेला आणि सुजीतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल असे वाटत होते. मात्र योग्य डावपेच, वेगवान चाली आणि आक्रमक पवित्रा घेत सुजीतने सामन्याचे पारडे फिरवले. त्याने सलग 8 गुण मिळवत 10-9 अशी आघाडी घेतली आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.
सुजीत कलकल याने आशियाई क्रीडा स्पर्धेची सुरुवात दमदार केली होती. अफगाणिस्तानच्या सय्यद उमर झाझाई याचा 13-3 असा पराभव करत त्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याने इराणच्या अब्बास इब्राहिम झादेसावदकुही याचा पराभव केला. उपांत्य फेरीत सुजीतसमोर जपानच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कोतारो कियोका याचे आव्हान होते. मात्र तिथेही सुजीतने बाजी मारत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत त्याने ताजिकिस्तानच्या खेळाडूला धोबीपछाड देत सुवर्णपदक जिंकले आणि इतिहास घडवला.





























































