
“मला काही माहिती नाही आणि या पथकाशी माझा काय संबंध?” अशी बेजबाबदार आणि बेफिकिर उत्तरे देणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद मोरे यांना लोकप्रतिनिधींनी चांगलेच धारेवर धरले. अधिकाऱ्याच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात प्रचंड गदारोळ घातला.
संगमेश्वर तालुक्यातील दऱ्या-खोऱ्यात वसलेल्या दुर्गम वाड्या-वस्त्या आणि विशेषतः धनगरवाड्यांमधील कष्टकरी नागरिकांना त्यांच्या थेट दारात वैद्यकीय उपचार मिळावेत, या हेतूने शासनाकडून ‘फिरते आरोग्य पथक’ सुरू करण्यात आले आहे. या सेवेसाठी जनतेच्या करांमधून मोठा निधी खर्च केला जात असताना, प्रत्यक्षात मात्र हे फिरते पथक गेल्या दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आला आहे.या गंभीर प्रकाराबाबत गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना निवेदन देऊन संबंधित आरोग्य यंत्रणेच्या कामकाज पद्धतीची तात्काळ सखोल चौकशी करण्याची आणि सेवा पूर्ववत करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात एकीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेऊन विविध शिबिरांद्वारे नागरिकांना सेवा पुरवत होते; तर दुसरीकडे मोठा खर्च करून चालवले जाणारे हे फिरते पथक मात्र पूर्णपणे बंद पडले होते. वाहनात बिघाड झाला असल्यास पर्यायी वाहनाची व्यवस्था करून दुर्गम भागात वैद्यकीय पथक का पाठवले गेले नाही? किंवा या कर्मचाऱ्यांना इतर आरोग्य केंद्रांत सेवेसाठी का पाठवले गेले नाही? असा थेट सवाल करत, या बेजबाबदार कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, गेल्या दोन वर्षांत हे पथक नेमके कुठे-कुठे फिरले? किती गरजूंवर उपचार झाले? आणि मागील दीड-दोन महिन्यांत या पथकाने प्रत्यक्ष काय काम केले? याचा संपूर्ण हिशोब जनतेसमोर मांडण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, तसेच हे फिरते पथक प्रत्यक्ष गावागावांत आणि धनगरवाड्यांत जाऊन सेवा देत असल्याची खात्री करा; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू!” असा इशारा लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला दिला आहे. या वेळी तालुकाप्रमुख नंदादीप बोरुकर, माजी उपसभापती अजित गावणकर, संदीप धावडे, दीपक भेरे, सचिन सावंत, प्रदीप चोगले, बाबू गोपाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे निलेश भुवड व इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते






























































