
देशातील भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईत आज आंदोलनाचे तुफान उसळले. कडक ऊन, असह्य उकाडा आणि घामाच्या धारांची पर्वा न करता हजारो ‘काॅक्रोचेस’ छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर धडकले आणि गद्दार ग्यानू मस्ट गो… हा नारा बुलंद केला. ‘ज्ञानू राजीनामा दे नाहीतर नरू घरी जाईल. आता माघार नाही’ असे ठणकावत, ‘चलो दिल्ली’ची हाक देण्यात आली. ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल अन्यथा 10 ऑक्टोबरला जंतर मंतरवर पुढचे आंदोलन होईल, अशी घोषणा अभिजित दीपके यांनी केली.
निवडणूक आयोगातील घोटाळे चव्हाटय़ावर आल्यापासून देशभरात संतापाची लाट असून ज्ञानेश कुमार यांना हाकलण्याची मागणी होत आहे. पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या काॅक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) याच मागणीसाठी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात आज मुंबईतून झाली. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातून हजारो तरुण शिवाजी पार्पवर पोहोचले. त्यामुळे हा परिसर गर्दीने फुलून गेला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्ककडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मैदानात जाण्यास बंदी केल्याने सीजीपीने मैदानाच्या प्रवेशद्वारावरच भव्य मंडप उभारत तेथेच ठिय्या दिला. हातात तिरंगा झेंडा आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील कल्पक पोस्टर लक्ष वेधून घेत होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, शर्लिन चोपडा, गायक विशाल ददलानी यांच्यासह सामाजिक व सांस्पृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आंदोलनाला हजेरी लावली.
आंदोलनाला आलेल्या 75 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
आंदोलनात सहभागी होण्यासाठी ठाण्याचे रहिवाशी गोपालक्रिष्णा पिल्लई (75) आले होते; पण आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तत्काळ सुश्रूशा इस्पितळात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वन टू थ्री फोर…
नरेंद्र मोदी वोट चोर
हमारे वोट का हिसाब… हमें दे दो ज्ञानेश कसाब
एक बिस्कीट दो चाय ज्ञानेश कुमार बाय बाय
एक जिरा, दो अजवाईन…. ज्ञानेशकुमार दो रिजाईन
एक चाय, दो खारी…ग्यानू अब तेरी बारी
धर्मेंद्र प्रधान झाकी है ज्ञानेश कुमार बाकी है
ग्यानू काका ग्यानू काका,
जिसने डाला वोट पे डाका
ग्यानू तुझा डेमॉक्रसीवर भरोसा नाय काय?
शिवसेनेचा पाठिंबा
काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली होती. आजच्या आंदोलनात मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी झाले. शिवसेनेचे आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सूरज चव्हाण हे व्यासपीठावर अभिजित दीपके आणि सहकाऱयांसह उपस्थित होते.
आमच्या पैशावर दुनिया फिरतात आणि चहा विकून पंतप्रधान झालो म्हणतात. का विकला? आम्ही सांगितलं होतं का विकायला? त्यापेक्षा शाळेत जायचं. शिकायचं, एखादी नोकरी करायची.
मोदींना आमदार-खासदार खरेदी करायचा इतकाच शौक आहे तर आयपीएलसाठी जसा लिलाव होतो, तसा आमदार-खासदारांचा लिलाव करावा. आमच्या मताला किंमत नसेल तर सरळ लिलाव करून टाका. बोली लावा. विकल्या जाणाऱया आमदार-खासदारांनाही शरम नाही. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असल्यासारखे भाजपसोबत निघून जातात.
मोदी-शहा, देश तुमच्या बापाचा नाही – दीपके
‘मोदी-शहा हे हिंदू आणि मुसलमान करून देशाचे तुकडे करत आहेत. पण आम्ही ते होऊ देणार नाही. हिंदुस्थान हा सर्व जातीधर्मांचा देश आहे. इथे सगळे एकत्र राहतात. दिवाळी, ईद एकत्र साजरे करतात आणि यापुढेही करणार. दिवाळी आली की पुरणपोळी खाणार, ईद आली की बिर्याणी खाणार. कोण थांबवणार? देश तुमच्या बापाचा नाही,’ अशी घणाघाती टीका सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोदी-शहांवर केली.
एकनाथ शिंदे शेल कंपनी!
‘प्रादेशिक पक्षांना संपवून टाकण्याचा भाजपचा डाव आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस हे पक्ष त्यासाठीच पह्डण्यात आले. काळे पैसे लपवण्यासाठी जशा शेल पंपन्या बनवल्या जातात, तसे आमदार लपवण्यासाठी भाजपने शेल राजकीय पक्ष बनवले आहेत. एकनाथ शिंदेंचा पक्ष ही अशीच एक शेल कंपनी आहे. शिंदे गटासारख्या भाजपच्या अनेक शेल कंपन्या आहेत. आमदार फोडून या शेल पंपन्यांकडे पाठवले जातात, मग त्यांचा पाठिंबा घेऊन सरकार बनवले जाते. असे सगळे देशात सुरू आहे,’ असे दीपके म्हणाले.




























































