एमपीएससी सचिवांची बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात आवाज उठविणाऱया परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. एमपीएससी पेपर फुटी आणि परीक्षा पद्धतीतील गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांची दखल घेत राज्य सरकारने आयोगाचे सचिव सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली केली आहे.

एमपीएससीकडून घेण्यात येणाऱया परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. परीक्षा पद्धतीतील वाढत्या गैरकारभाराबाबत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. दोनच दिवसांपूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचे सचिव हरपाळकर यांची बदली करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अखेर आज हरपाळकर यांची बदली करण्यात आली.

तत्काळ पदभार सोडण्याचे आदेश

सामान्य प्रशासन विभागाने हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. महेंद्र हरपाळकर, सहसचिव संवर्ग यांची एमपीएससीच्या सचिवपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली होती. आता प्रशासकीय कारणास्तव त्यांची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येत असून, हरपाळकर यांनी कार्यभार तत्काळ सोडवा, असे या आदेशात म्हटले आहे.