
देशाचे भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना-मनसेने रविवार, 4 ऑक्टोबर रोजी विराट ‘गर्जना’ मोर्चाची हाक दिली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. पोलिसांच्या विनंतीवरून या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला असून मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा असेल. सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल, अशी माहिती आज शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मतदार फेरतपासणी प्रक्रिया राबवण्यापासून निवडणुकीशी संबंधित अनेक निर्णय घेताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या मनमानीचे अनेक पुरावे समोर आले आहेत. ज्ञानेश कुमार यांचे भाजपशी असणारे लागेबांधेही स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत रविवारी होत असलेल्या शिवसेना-मनसेच्या गर्जना मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनी ते मुंबई महापालिका मुख्यालय असा मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. गुरुवारी यासंदर्भात शिवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन चर्चा केली. तेव्हा आयुक्तांनी मोर्चा मार्गात येणाऱया जे.जे. उड्डाणपुलावर गर्दीच्या अनुषंगाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत मोर्चाच्या मार्गात थोडा बदल करण्याची विनंती केली. ती विनंती दोन्ही पक्षांनी मान्य केली असून मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा मोर्चाचा नवा मार्ग असेल, असे अनिल परब यांनी नमूद केले. यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, मनसेचे नेते नितीन सरदेसाई उपस्थित होते.
तिरंगा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादीसह डावे पक्षही उतरणार आहेत.
असा असेल मोर्चाचा मार्ग
मेट्रो सिनेमाजवळून सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा महापालिका मार्गावरून मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ जाईल. याच ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार असून प्रमुख नेते मोर्चाला संबोधित करणार आहेत.





























































