ज्ञानेश कुमारच नाही, तर पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल; इतका भयंकर वणवा देशात पेटतोय, संजय राऊत कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थोड्याच वेळात मुंबईत शिवसेना-मनसेचा गर्जना मोर्चा निघणार आहे. या मोर्चापूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही सुरुवात असून देशात ठिणगी पडताना दिसत आहे. 10 ऑक्टोबरला जंतरमंतरला मोठे आंदोलन होत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, फक्त ज्ञानेश कुमारच नाही, तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल इतका भयंकर वणवा देशात पेटण्याची भीती मला वाटतोय, असे संजय राऊत म्हणाले. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात आणि पुन्हा विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका घ्यायला हव्यात, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मुंबईतील मोर्चाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही गर्जना संविधान वाचवण्यासाठी, निवडणूक आयोगातील भ्रष्टाचार, घोटाळे, निवडणुका हायजॅक करणे, कोट्यवधी मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करणे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या भाजपचे एजंट ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यासाठी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकारातून हा मोर्चा निघतोय. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर सर्व घटकपक्षांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. मेट्रो सिनेमापासून मोर्चा निघणार असून मुंबई महानगरपालिकेसमोर एक तात्पुरते व्यासपीठ उभारण्यात आलेले आहे. तिथे मोर्चा थांबेल आणि प्रमुख नेते भूमिका मांडतील.

उद्या दिल्लीत विरोधी खासदारांचा याच विषयावर मोर्चा निघणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे दिल्लीला रवाना होणार आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तसेच आज सायंकाळी पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही आपण सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले. या आंदोलनाला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे जाणार होते. पण त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे शिवसेनेतर्फे मी जाणार असून याबाबत रोहित पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, देश खदखदत असून अंधभक्तांनी धर्मांधतेच्या कितीही डफळ्या आणि डमरू वाजवले तरी लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न वेगळे आहेत. अंधभक्तांची पिढी 14 वर्षांत मागे पडली असून नवीन पिढी जन्माला आलेली आहे. त्यांना मोदी-शहा यांचे ढोंग, सोंग कळलेले आहे. लहान लहान मुलं रस्त्यावर उतरत आहेत. याचा अर्थ पुढची पिढी मोदी-शहा लोकांना जुमानत नाही आणि त्यांच्या ढोंगाला किंमत देत नाही.

‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आंदोलनाला राहुल गांधी यांचा पाठिंबा, एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलन

मोर्चात वापरण्यात येणाऱ्या भाषेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, तुम्ही आमच्याविषयी जी भाषा वापरली त्या भाषेला आलेली ही फळं आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आमच्या विषयी तुम्ही संसदेत आणि संसदेबाहेर कोणती भाषा वापरली याच्या क्लिप पहा. तुम्हाला त्याच भाषेत चोख उत्तर दिले तर आता वेदना होत आहेत. पण शेवटी कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. त्यामुळे भाषेच्या संदर्भात भाजपकडून मार्गदर्शन घेण्याइतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आलेली नाही. भाषा योग्य असून तीच तुम्हाला समजते, असेही संजय राऊत म्हणाले.