
गंगापूर तालुक्यातील रायपूर डोणगाव परिसरात असलेल्या इंदिरा गांधी सैनिकी निवासी शाळेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच देवगाव रंगारी तसेच शिलेगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.
सीमा सर्जेराव बंदुके असे गळफास घेणाऱ्या या विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची गडाळा तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील आहे. इंदिरा गांधी सैनिकी स्कूल हे रायपूर शिवारात असून या ठिकाणी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात आदिवासी विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या शाळेत हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यात एकीकडे आदिवासी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आंदोलन सुरू असताना एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गाव घेत बेशुद्ध अवस्थेत विद्यार्थिनीला रुग्णालयात हलविले आहे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार उघडकीस येतात शाळा व्यवस्थापना कुणाकडून पालकांना माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.


























































