होर्मुझमध्ये जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 11 हिंदुस्थानी खलाशी जखमी, परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझच्या सामुद्रधुनीत मंगळवारी पनामा ध्वजांकित एमटी ऑन पीस या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 11 हिंदुस्थानी खलाशांसह 12 कर्मचारी जखमी झाले आहेत. ओमान अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमी कर्मचाऱ्यांना जहाजातून बाहेर काढण्यात आले असून सर्व जखमींवर ओमानमधील खसाब येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंदुस्थानने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

हल्ला झाला त्या वेळी जहाजावर 17 हिंदुस्थानी नागरिकांसह एकूण 19 कर्मचारी होते. या प्रदेशात जहाजांवर होणारे सततचे हल्ले ही चिंतेची बाब आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी हे हल्ले तत्काळ थांबवण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. या प्रदेशात व्यापारी जहाजे, खलाशी आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबले पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय जलमार्गांतून होणारी जहाज वाहतूक आणि व्यापार शक्य तितक्या लवकर पूर्ववत व्हायला हवा, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

‘एमटी ऑन पीस’वरील हा हल्ला होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये झालेल्या वाढीचाच एक भाग आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात कुवेतचे एमटी काझिमा 3 आणि लायबेरियाचे ‘लिप्सी’ या जहाजांसह किमान सात टँकरवर हल्ले झाले आहेत. या जलमार्गावरून होणारी कच्च्या तेलाची वाहतूक युद्धपूर्व पातळीच्या जवळ पोहोचली असतानाही हे हल्ले सुरूच आहेत. या संघर्षात हिंदुस्थानी खलाशीही बळी पडत आहेत. जुलै महिन्यात इराणच्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी ओमानच्या सागरी हद्दीतून जाणाऱ्या ‘एमटी मोम्बासा’ आणि ‘एमटी अल बहिया’ या संयुक्त अरब अमिरातीशी संबंधित दोन टँकर्सना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात एक हिंदुस्थानी कर्मचारी ठार झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते.

इराण-अमेरिका यांच्यात संघर्ष वाढला

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जहाजांवर होणारे हल्ले तीव्र झाले आहेत. 9 सप्टेंबर रोजी अमेरिकेने इराणचे पाच तेल टँकर्स उडवल्यानंतर, इराणने सामुद्रधुनीजवळून जात असलेल्या 10 जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला होता, ज्यामध्ये किमान एक खलाशी ठार आणि एक जण बेपत्ता झाला होता. इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर या दोन देशांतील संघर्ष अधित तीव्र झाला आहे.