
फुटबॉलविश्वावर दोन दशके अधिराज्य गाजवणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या जर्सीतील सुवर्णपर्वावर आज अखेर पडदा पडणार आहे. ब्युनोस आयर्सच्या एस्टाडियो मॉन्युमेंटलवर बेनिनविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात 39 वर्षीय मेस्सी अखेरच्या वेळी अर्जेंटिनाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे केवळ फुटबॉल सामना म्हणून नव्हे, तर एका महानायकाच्या भावनिक निरोपाचा क्षण म्हणून पाहिले जात आहे.
जवळपास दोन दशके अर्जेंटिनाचे नेतृत्व करताना मेस्सीने देशाला अनेक ऐतिहासिक यश मिळवून दिले. 2022 चा विश्वचषक, 2021 आणि 2024 ची कोपा अमेरिका तसेच 2008 चे ऑलिम्पिक सुवर्णपदक त्याच्या कारकीर्दीतील मैलाचे दगड ठरले. 2014 आणि 2026च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही त्याने अर्जेंटिनाचे नेतृत्व केले. 125 गोलांसह तो अर्जेंटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.
मेस्सी जैसा कोई नही
अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मेस्सीच्या निरोपाला संघासाठी मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. मेस्सीने असा वारसा निर्माण केला आहे, ज्याची बरोबरी करणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र मेस्सीनंतरही अर्जेंटिनाचा संघ सर्वोच्च पातळीवर कायम राहील, असा विश्वास स्कालोनी यांनी व्यक्त केला.
नव्या पिढीची धडाडी
मेस्सीशिवाय खेळलेल्या मागील दोन सामन्यांत अर्जेंटिनाने बोलीव्हियाचा 4-0, तर बुर्किना फासोचा 7-0 असा धुव्वा उडवला. निकोलस पाझ, फ्रोंको मास्टानतुओनो, जियानलुका प्रेस्तियानी आणि लिओनेल फ्लोरेस या युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने नव्या पर्वाची चाहूल दिली आहे. पाझकडे मेस्सीचा संभाव्य वारसदार म्हणून पाहिले जात आहे.
मेस्सीच्या सावलीतून बाहेर पडण्याची कसोटी
मेस्सीच्या निरोपानंतर अर्जेंटिनासमोर मोठा प्रश्न असेल तो म्हणजे या महानायकाविना विजेतेपदांची परंपरा कायम ठेवण्याचा. मॅराडोनाच्या युगानंतर अर्जेंटिनाला मोठय़ा जेतेपदासाठी 35 वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. आता मेस्सीच्या सावलीतून बाहेर पडून नवी पिढी अर्जेंटिनाला कुठे घेऊन जाते, याची खरी कसोटी 2028 च्या कोपा अमेरिका स्पर्धेत लागणार आहे. लाउतारो मार्टिनेझसारख्या अनुभवी खेळाडूंवर नव्या अर्जेंटिनाची धुरा असेल.



























































