स्मृती मानधना बनली हिंदुस्थानची नवी कर्णधार, हरमनप्रीत कौरचा अचानक कर्णधारपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मृती मानधनाची हिंदुस्थानच्या महिला संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मंगळवारी बीसीसीआयमध्ये जोरदार चर्चा रंगल्या. मंगळवारी सकाळी हरमनप्रीत कौरला बीसीसीआयने कर्णधारपदावरून पायउतार होण्यासाठी सांगितले. हरमनप्रीत संघाचे कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हती, पण बीसीसीआयच्या दबावामुळे तिला कर्णधारपद सोडावे लागले. त्यानंतर बीसीसीआयने स्मृतीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

हरमनप्रीत कौरने हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. जून 2022 मध्ये मिताली राजच्या निवृत्तीनंतर हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानी संघाची सूत्रे हाती घेतली होती. तिच्या कर्णधारपदाखाली हिंदुस्थानचा महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेता बनला. हिंदुस्थानने 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघांना पराभूत केले. यासह हरमनप्रीत कौरने हिंदुस्थानला आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके मिळवून दिली.

सोशल पोस्टद्वारे राजीनामा जाहीर

हरमनप्रीतने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला. तिने लिहिले, ‘आज, मी हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा सोपा निर्णय नाही. यासोबत अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे क्षण जोडलेले आहेत, जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मी या संघाला आणि हिंदुस्थानी महिला क्रिकेटला माझे सर्वस्व दिले आहे. माझे रक्त, माझा घाम, माझा वेळ माझी प्रगती आणि स्वतःसाठी असलेल्या माझ्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या. कारण माझा विश्वास होता की, संघ सर्वात महत्त्वाचा आहे.’

कर्णधार म्हणून कठीण निर्णय घ्यावे लागतात

हरमनप्रीतने लिहिले की, ‘एक कर्णधार म्हणून मला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले. हे निर्णय सोपे नव्हते आणि कधीकधी त्याची वैयक्तिक किंमत मोजावी लागली. मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे एकच ध्येय होते. या संघाला अधिक चांगले बनवणे आणि इतर खेळाडूंना प्रगती करण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त केले. मी सर्वात वाईट क्षण, हृदयभंग, वाईट गोष्टी आणि असे दिवस पाहिले आहेत जेव्हा काहीही आमच्या मनासारखं होत नव्हतं. मी सर्वोत्तम क्षणही पाहिले आहेतः विजय, जल्लोष, माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आणि तो क्षण जेव्हा प्रत्येक त्याग सार्थकी लागला.’

आता ही पुढे जाण्याची वेळ

हरमन म्हणाली की, ‘कर्णधारपद आज माझ्याकडे नसेल, पण हिंदुस्थानी क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही संपणार नाही. प्रत्येक संघसहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन, बीसीसीआय, कुटुंबीय आणि प्रत्येक चाहत्याचे आभार, जे सुख-दुःखात माझ्या पाठीशी उभे राहिले. रक्त, घाम, त्याग, अभिमान मी सर्व काही दिले आहे. आता, मी पुन्हा एकदा खेळाच्या प्रेमापोटी खेळायला तयार आहे. कर्णधारपद नसले तरी प्रवास सुरूच आहे.’