ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही; CJP ने 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाचे पोलिसांना दिले निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे नेते सौरव दास यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांची भेट घेत आंदोलनाबाबत अधिकृत माहिती दिली. सौरव दास यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आंदोलनाची माहिती देणारे पत्र सादर केले. सीजेपी तसेच देशभरातील तरुण 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर एकत्र येणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिसांचे सहकार्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पोलिसांकडे पत्र सादर केल्यानंतर त्याची अधिकृत पोच मिळाल्याचेही दास यांनी सांगितले. पोलिसांनी सीजेपीकडून आवश्यक ती हमी घेतली असून, आंदोलनासाठी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे. मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कथित अनियमिततांविरोधात देशातील तरुणांमध्ये नाराजी असल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर 10 ऑक्टोबरचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबवणार नसल्याचे सीजेपीकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची तयारी पूर्ण झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले असून, देशातील तरुणांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.