बॉलिवूडच्या ‘गोल्डन गर्ल्स’ची मैत्री आजही कायम; निसर्गसान्निध्यात एकत्र दिसल्या आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

बॉलिवूडमध्ये अनेक मैत्रीच्या जोड्या पाहायला मिळतात; पण काही मैत्री काळाच्या कसोटीवरही तितकीच घट्ट राहते. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन यांची मैत्री याचं सुंदर उदाहरण आहे. सध्या या तिघीही शहरातील धावपळ आणि गोंगाटापासून दूर डोंगरांच्या कुशीत सुट्टीचा आनंद घेत आहेत. निसर्गाच्या कुशीत एकत्र सुट्टीचा आनंद घेत असलेल्या या ‘गोल्डन गर्ल्स’चा फोटो पाहून चाहत्यांनाही त्यांच्या जुन्या, खास मैत्रीची आठवण झाली आहे.

आशा पारेख यांनी त्यांच्या या खास ट्रिपची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. फोटोमध्ये आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन एकत्र बसलेल्या दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना आशा पारेख यांनी आपल्या प्रिय मैत्रिणींसोबत निसर्गसान्निध्यात वेळ घालवत असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत प्रवास करणे आणि निवांत वेळ घालवणे नेहमीच आनंददायी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन या तिघींनी आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या काळात तिघीही आपापल्या क्षेत्रात लोकप्रिय होत्या. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात असूनही त्यांच्या मैत्रीत स्पर्धा किंवा मत्सराला स्थान मिळालं नाही. उलट परस्परांचा आदर आणि जिव्हाळा त्यांच्या नात्याची खासियत ठरला.

पार्टी असो, डिनर असो किंवा परदेशातील सहल… या मैत्रिणी अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसल्या आहेत. त्यांच्या गेट-टुगेदरचे फोटोही सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. विशेष म्हणजे, अनेक वर्षांची मैत्री असूनही या तिघींनी एकत्र कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही.

या मैत्रीची खरी ताकद मात्र केवळ मौजमजा आणि सहलींपुरती मर्यादित नाही. आशा पारेख यांनी आपल्या काही मुलाखतींमध्ये आयुष्यातील कठीण काळाचा उल्लेख केला आहे. त्या काळात वहीदा रहमान आणि हेलेन यांनी त्यांना भावनिक आधार दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आशा पारेख यांच्या या खास मैत्रीच्या वर्तुळात सायरा बानो आणि दिवंगत शम्मी आंटी यांचाही समावेश होता. सुख असो वा दुःख, या मैत्रिणी एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळेच दशकं उलटली, काळ बदलला, पडद्यावरची कारकीर्द बदलली; पण या मैत्रिणींच्या नात्यातला जिव्हाळा आजही कायम आहे.