रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील गैरसोयीचा शिवसैनिकांनी वाचला पाढा, तात्काळ सुधारणा करा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जिल्हा शासकीय रूग्णालयातील सिटी स्कॅन यंत्रणा कधी सुरू होणार? अपघात विभागात अनेक वेळा तज्ञ डॉक्टर नसतात. शल्यचिकित्सक नसल्याने वेळेत शस्त्रक्रिया होत नाही.गंभीर रूग्णावर तात्काळ उपचार सुरू करण्यापूर्वी कागदपत्र रंगवत बसतात.अनेकवेळा रूग्णांना उपचारासाठी ताटकळत ठेवले जाते यायर्व तक्रारींबाबत सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल धडा शिकवू असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा शासकीय रूग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना दिला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश डॉ. रामानंद यांची भेट घेतली.यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. सांगवीकर उपस्थित होते.जिल्हा शासकीय रूग्णालयातील दुरावस्थेचा शिवसैनिकांनी पाढा वाचला.सिटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने गोरगरीब रूग्णांना खासगी रूग्णालयात जावे लागते.
तात्काळ सिटी स्कॅन यंत्रणा सुरू करा अशी मागणी शिवसैनिकांनी केली.त्याबाबत डॉ.जयप्रकाश रामानंद म्हणाले की, सिटी स्कॅन यंत्रणा दुसरी संस्था चालवत होती.ती यंत्रणा आता जिल्हा रूग्णालय ताब्यात घेणार आहे.सिटी स्कॅन मशीनचे एका ट्यूबचे काम आहे त्याला ६० लाख रूपये खर्च आहे.तो त्या संस्थेला करायला सांगितला आहे.तसेच सिटी स्कॅनसाठी रूग्णाला येणारा खर्च आम्ही महात्मा फुले आरोग्य अभियानातूनच देणार आहोत.तसेच एमआरआयचा आमच्याकडे प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघाल विभागात गंभीर रूग्णांवर तात्काळ उपचार सुरू करा कागदपत्र नंतर पहा.तसेच रूग्णालयातील वाहतूकीच्या कोंडी या दोन्ही प्रश्नावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.तसेच अपघात विभागात तज्ञ डॉक्टर तसेच शल्यचिकित्सक कायम उपल्बध्द ठेवा जेणेकरून रूग्णावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात येईल हे सांगताना एका अपघात ग्रस्त रूग्णाला जिल्हा रूग्णालयात उपचार न झाल्याने मुंबईत जावे लागले तिथे त्याला तीन लाख रूपये खर्च आला.त्यावेळी निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील,तालुका समन्वयक शेखर घोसाळे,शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहर प्रमुख नितीन तळेकर,नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर,माजी नगसेवक सलील डाफळे,रशिदा गोदड,महिला शहर संघटक सेजल बोराटे,विभागप्रमुख किरण तोडणकर,राजाराम रहाटे, अमित खडसोडे,बाबू चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.