
मुंबईकरांना शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे हे पालिकेचे मूलभूत कर्तव्य असताना शहरात दररोज उचलल्या जाणाऱ्या पाण्यापैकी तब्बल 34 टक्के पाणी हिशेबाबाहेर जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
जलवाहिन्यांची गळती, अनधिकृत नळजोडण्या आणि चोरीमुळे पाणी वाया जात असल्याची कबुली नुकतीच पालिका प्रशासनाने दिली होती. याची गंभीर दखल घेऊन महापौर रितू तावडे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांना पत्र पाठवून सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याचे थेट निर्देश दिले आहेत.
मुंबईची सद्यस्थितीतील दैनंदिन पाण्याची गरज सुमारे 4,600 दशलक्ष लिटर इतकी असताना प्रत्यक्षात धरणांमधून दररोज सुमारे 4,800 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. मात्र, यातील केवळ 3,100 दशलक्ष लिटर पाणीच प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचत असून उर्वरित तब्बल 34 टक्के पाण्याचा कोणताही हिशेब लागत नसल्याचे प्रशासनाने स्थायी समितीसमोर केलेल्या सादरीकरणात नमूद केले आहे.
– सध्याच्या घडीला मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे समाधानकारक भरलेली असली तरी आगामी काळातील हवामान बदलाचे संकट आणि ‘अल निनो’चा संभाव्य प्रभाव पाहता पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत हा साठा पुरवणे पालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
– भूमिगत गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची स्थिती, अनधिकृत नळजोडण्या शोधून पाणीचोरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रभागनिहाय राबवलेली मोहीम याची माहिती महापौरांनी मागवली आहे



























































