
दापोली तालुक्यातील प्रस्तावित भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पासह चिखलगाव येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला प्रखर विरोध करत येथील ग्रामस्थांनी सोमवारी दापोली तहसील कार्यालयावर धडक दिली. संबंधित प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी मोर्चातून केली. त्यानंतर तहसीलदार अर्चना बोंबे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
भिवबंदर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती, शेती, बागायती, मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे औद्योगिक किंवा ऊर्जा प्रकल्प उभारताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे, त्यांच्या हरकती जाणून घेणे आणि प्रकल्पाचे पर्यावरणीय व सामाजिक परिणाम स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करा!
दापोली तालुक्याची ओळख निसर्गसंपन्न आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा तालुका म्हणून आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम करणारे प्रकल्प लादू नयेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. नागरिकांचा विकासाला विरोध नसून स्थानिकांच्या हक्कांचे, पर्यावरणाचे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करूनच विकास झाला पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.





























































