हिंदुस्थानच्या कर्णधारांची चमक, आयसीसी क्रमवारीत श्रेयस अय्यरने घेतली 18 स्थानांची झेप; शुभमन गिलने अव्वल स्थान कायम राखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत हिंदुस्थानच्या कर्णधारांची चमक पाहायला मिळाली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तुफानी फटकेबाजी करत शतक झळकावणाऱया श्रेयस अय्यरने क्रमवारीत दमदार भरारी घेतली आहे. श्रेयसने या क्रमवारीत तब्बल 18 स्थानांची मोठी झेप घेत टॉप-10 मध्ये आपले स्थान पटकावले आहे.

श्रेयस आता थेट सातव्या स्थानावर पोहोचला असून तो पहिल्यांच अव्वल 10 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. वन डे क्रमवारीतही हिंदुस्थानचा वन डे कर्णधार शुभमन गिलने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

हिंदुस्थानची टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांत धडाकेबाज कामगिरी झाली आहे आणि तेच या क्रमवारीत पाहायला मिळाले आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत हिंदुस्थानचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. अव्वल 10 मध्ये चार हिंदुस्थानी फलंदाज आहेत. टी-20 क्रमवारीत ईशान किशन पहिल्या, तर अभिषेक शर्मा दुसऱया स्थानावर आहे. श्रेयस सातव्या आणि तिलक वर्मा दहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडीजचा फलंदाज शेर्फेन रदरफोर्डनेही हिंदुस्थानविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले. यामुळे त्याला 10 स्थानांची झेप घेत 37 व्या स्थानावर पोहोचण्यास मदत झाली आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये गिलचे वर्चस्व कायम

शुभमन गिलने एकदिवसीय क्रमवारीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तो अव्वल स्थानी कायम आहे. गुवाहाटीमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 223 धावांची विक्रमी नाबाद खेळी करून त्याने आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. त्याचे आता 841 गुण झाले आहेत. वेस्ट इंडीजचा कर्णधार शाई होपने मालिकेत दोन शतके झळकावली होती. त्यानेही दोन स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे. हिंदुस्थानचा अनुभवी खेळाडू के. एल. राहुलने सात स्थानांची झेप घेतली असून तो संयुक्त दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडीजचा डावखुरा फलंदाज अमीर जांगू, जो यापूर्वी अव्वल 100 खेळाडूंमधून बाहेर होता थेट आता 55 व्या स्थानावर पोहोचला आहे.

पाकिस्तानच्या अबरारच्या वर्चस्वाचा अंत

गोलंदाजांच्या क्रमवारीत लक्षणीय बदल झाले आहेत. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदने आपले अव्वल स्थान गमावले आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान पुन्हा एकदा अव्वल टी-20 गोलंदाज बनला आहे. हिंदुस्थानचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल 16 स्थानांनी पुढे जात सातव्या स्थानावर पोहोचला आहे, तर बांगलादेशचा नसूम अहमद तीन स्थानांनी पुढे जात आठव्या स्थानावर पोहोचला आहे. मेहंदी हसन 10 स्थानांनी पुढे जात नवव्या स्थानावर पोहोचला आहे.