राहुल-जैसवालची लाल चेंडूची रंगीत तालीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी के. एल. राहुल आणि यशस्वी जैसवाल या टीम इंडियाच्या प्रमुख सलामीवीरांना लाल चेंडूच्या क्रिकेटची रंगीत तालीम मिळणार आहे. दोघेही 26 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणाऱया हिंदुस्थान ‘अ’च्या तीन सामन्यांच्या दौऱयात खेळणार आहेत.

हिंदुस्थान ‘अ’च्या संघात ऋषभ पंतचाही समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून असेल. गेल्या आठवडय़ात श्रीनगरमध्ये झालेल्या इराणी करंडकात पंतने रेस्ट ऑफ इंडियाचे नेतृत्व करत जम्मू-कश्मीरचा पराभव केला. त्यानंतर तो आजारी असल्याचे वृत्त असून त्याला फ्लूची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया रणजी हंगामातील पहिल्या सामन्यातून पंतने माघार घेतली आहे.

कसोटीतील हिंदुस्थानचा सध्याचा तिसऱया क्रमांकाचा फलंदाज देवदत्त पडिक्कल, तसेच दुखापतीतून पुनरागमन केलेला साई सुदर्शन यांनाही संघात स्थान मिळाले आहे. इराणी करंडकात सात महिन्यांनंतर पुनरागमन करत सहा विकेट घेणारा आकाश दीप आणि दुसऱया डावात सहा विकेट मिळविणारा मुकेश कुमार यांच्यावरही निवड समितीने विश्वास दाखवला आहे. अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि 2025-26च्या रणजी हंगामात 60 विकेट घेणारा औकीब नबी हे अन्य वेगवान गोलंदाज आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि मानव सुथार हे प्रमुख फिरकी पर्याय आहेत. हिंदुस्थान ‘अ’चा दौरा 16 ऑक्टोबरला सुरू होईल. पहिला सामना 26 ऑक्टोबरला लिंकनमध्ये, दुसरा ख्राईस्टचर्चच्या हेग्ली ओव्हलवर, तर तिसरा सामना 10 नोव्हेंबरला लिंकनमध्ये होईल. त्यानंतर हिंदुस्थान-न्यूझीलंड कसोटी मालिका 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, वेलिंग्टन आणि ख्राईस्टचर्च येथे सामने होतील. 2020 नंतर टीम इंडिया प्रथमच न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे.

हिंदुस्थान ‘अ’ संघ ः यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, आर. स्मरण, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, औकीब नबी, आकाश दीप, अंशुल कंबोज, मानव सुथार, मुकेश चौधरी, साई सुदर्शन, यश राठोड, मुकेश कुमार.