नऊ हिंदुस्थानी मल्लांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

अमेरिकेतील लास वेगास येथे 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान होणाऱया 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी हिंदुस्थानी मल्लांना मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानी कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) 16 मल्लांपैकी तब्बल नऊ जणांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे या मल्लांचा जागतिक स्पर्धेतील सहभाग धोक्यात आला आहे. 2024 च्या 17 वर्षांखालील जागतिक विजेत्या नेहा सांगवानचाही समावेश आहे.

बुधवारी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात या मल्लांच्या व्हिसासाठी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी 20 वर्षांपेक्षा कमी वय आणि नोकरी नसल्याचे कारण देत अर्ज नाकारण्यात आल्याचे मल्लांना तोंडी सांगण्यात आले. मुलाखतीनंतर त्यांचे पासपोर्टही परत करण्यात आले. ‘डब्ल्यूएफआय’ने या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी अमेरिकन दूतावासाकडे केली आहे. या वयोगटातील अनेक मल्ल सध्या केवळ क्रीडा कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे औपचारिक नोकरी नसणे स्वाभाविक असल्याचे महासंघाने पत्रात स्पष्ट केले आहे.