
लाखो रुपये खर्च करून फिल्टर प्लाण्टची दुरुस्ती करण्यात आली. मात्र तरीदेखील आज नेरळमधील एका घरात नळातील पाण्यातून चक्क एक फुटाचा साप आल्याने खळबळ उडाली. वळवळणाऱ्या सापाला पाहून या कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. आठवडाभरापूर्वीही गढूळ पाणी येत होते. आता एक फुटी साप आल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या बेभरोसे कारभारामुळे नेरळकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात गाळयुक्त आणि गढूळ पाणीपुरवठा होत असताना आता नळातून एक फुटी सापच आल्याने संताप व्यक्त होत आहे. अशोक जाधव यांच्या घरात हा प्रकार घडला. मार्च महिन्यात नळातून जिवंत कोळंबी आली होती. त्यावेळी गटाराच्या नाल्यात असलेल्या जुन्या लोखंडी पाइपलाइन सडल्यामुळे त्यामध्ये काही जंतू किंवा जीव तयार होऊन ते पाण्यासोबत नळातून येत असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले होते.
पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
जलशुद्धीकरणाच्या फिल्टर प्रक्रियेतून असे जीव नळापर्यंत येणे शक्य नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आज समोर आलेला साधारण एक फूट लांबीचा जीव नेमका कुठून आला, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गढूळ पाणी, जलशुद्धीकरण यंत्रणेवरील खर्च आणि आता नळातून सापसदृश जीव अशा सलग घटनांमुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान या घटनेची खात्री करून घेतली जाईल, तसेच हा जीव नेमका काय आहे आणि तो पाणीपुरवठा यंत्रणेतून आला आहे का, याची तपासणी केली जाईल, असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.





























































