आदिवासी तरुणी ट्रेनमधून गायब, आसामच्या तरुणीचा मृतदेह सापडला आंध्रप्रदेशातील जंगलात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
andhra-pradesh-missing-assam-tribal-girl-dead-body-found-malayapuram-forest-dibrugarh-vivek-express

आसाममधील एका तरुणीचा मृतदेह आंध्रप्रदेशमध्ये सापडला आहे. ट्रेन प्रवासादरम्यान ती बेपत्ता झाली होती, त्यानंतर काही दिवसांनी हा मृतदेह आढळला. आसामच्या कामरूप जिल्ह्यातील ही २० वर्षीय आदिवासी तरुणी विशाखापट्टणम ते गुवाहाटी असा प्रवास करत होती, अशी माहिती समोर आली आहे.

तरुणीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती डिब्रूगड विवेक एक्सप्रेसने (ट्रेन २२५०३) प्रवास करत होती. तिने ५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी विशाखापट्टणमवरून ट्रेन पकडली होती आणि ती गुवाहाटीला चालली होती. ट्रेन विशाखापट्टणमवरून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी सुटली आणि ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी गुवाहाटीला पोहोचणार होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुवाहाटीच्या एका कॉलेजची विद्यार्थिनी असलेली ही तरुणी एका डान्स पर्फॉर्मन्ससाठी आंध्रप्रदेशला गेली होती आणि तिथून घरी परतत होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांची तिच्याशी शेवटची ६ ऑक्टोबर रोजी मंगळवारी पहाटे २ वाजून ३९ मिनिटांनी बोलणे झाले होते.

तिच्या शेवटच्या मेसेजमध्ये तिने म्हटले होते की, तिच्याभोवती खूप माणसे असल्याने तिला भीती वाटत आहे.

गुवाहाटीमधील लोहमार्ग पोलिसांकडे ही तक्रार नोंदवण्यात आली आणि रेल्वेच्या १३९ या हेल्पलाईनद्वारेही नोंदवण्यात आली.

तक्रारीनंतर, डिब्रूगड विवेक एक्सप्रेसच्या एस-२ डब्यात तिची बॅग सापडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिच्या मार्गावर तिचा शोध सुरू केला.

रेल्वे सुरक्षा दलाला आता या २० वर्षीय आदिवासी तरुणीचा मृतदेह सापडला आहे. आंध्रप्रदेशमधील मलयपुरम जवळील एका जंगलात हा मृतदेह आढळून आला, अशी माहिती एका आरपीएफ (RPF) सूत्राने दिल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती रेल्वे पोलीस सूत्रांनी दिली आहे.

तिचे कुटुंब आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बोन्डा पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या चापैडांग येथील राहणारे आहे.