निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या खासदारांना का भेटू शकत नाही? अभिषेक बॅनर्जींचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि मतदार याद्यांमधील गैरव्यवहारांच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. गुरुवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीतील राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन करत आपले आंदोलन सुरू ठेवले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल करत, “निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या खासदारांना का भेटू शकत नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे.

सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या आंदोलनात इंडिया आघाडीचे खासदार आज बसने राजघाटावर पोहोचले होते. महात्मा गांधींच्या स्मारकावर आदरांजली वाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अभिषेक बॅनर्जी यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त आणि संवैधानिक संस्थेने पारदर्शकपणे काम करणे अपेक्षित असते. मात्र जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना आणि विरोधी पक्षांच्या खासदारांना भेटायला निवडणूक आयोग का टाळाटाळ करत आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मतदार याद्यांच्या एसआयआर मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी झाल्याचा आणि कोट्यवधी मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करत इंडिया आघाडी सध्या आक्रमक झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावर दिल्लीत जोरदार निदर्शने सुरू आहेत.