मुंबईतील शक्तिपीठे सज्ज, उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात; महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरांत चोख बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिशक्ती आदिमायेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला उद्या रविवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरातील प्रमुख देवी मंदिरांत आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे. मुंबईतील श्री महालक्ष्मी आणि श्री मुंबादेवी मंदिरातदेखील चोख व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर रांगेत उभ्या राहणाऱया भाविकांच्या सोयीसाठी मंडप, पिण्याचे पाणी आणि सरबताची व्यवस्था केली आहे.

मुंबईची आराध्य देवता असणाऱया महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होते. उत्सव काळात श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी दररोज पहाटे 5.30 वाजता उघडणार असून रात्री 11 वाजता बंद होईल. सकाळी 7 ते 7.30 वाजेपर्यंत आरतीसाठी, दुपारच्या नैवेद्यासाठी 12 ते 12.20 पर्यंत, सायंकाळची धुपारती 6.30 ते 6.40 वाजेपर्यंत, त्यानंतर सायंकाळच्या आरतीसाठी 7.30 ते 8 या काळात मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद राहील. मंदिरासह लगतच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी एआयचा वापर करून 77 अत्याधुनिक सीसीटीव्ही पॅमेरे बसविले आहेत, असे मंदिर प्रशासनाने कळवले आहे.

नवरात्रोत्सव काळात श्री मुंबादेवी मंदिर दररोज पहाटे 5.30 वाजता उघडेल आणि रात्री 10 वाजता बंद होईल. पहिल्या दिवशी मंदिर सकाळी 5.30 वाजता मंगल आरतीने उघडेल आणि सकाळी नऊच्या दरम्यान घटस्थापना होईल.