जिवलग मित्र हरपला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनयसम्राट आणि संवेदनशील मनाचा माणूस म्हणून सर्वांना सुपरिचित असणारे ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांचे निधन कलाविश्वापासून सामान्यांपर्यंत साऱ्यांसाठीच चटका लावणारे… नाना हे एक अजब रसायन होते. कलाविश्वात ज्या कलाकारांचा दरारा होता, त्या यादीत नाना पाटेकर यांचं नाव नेहमीच अग्रस्थानी राहील. त्यांच्या स्वभावाची अनेक रूपं होती. या रुपातील नानांना जवळून अनुभवणाऱ्या कलाविश्वातील सहोदरांनी त्यांच्या या मित्राला, मार्गदर्शकाला वाहिलेली ही आदरांजली! 

>> अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

नाना पाटेकर गेल्याची बातमी ऐकल्यापासून मनाला फार मोठा धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यातली ही अत्यंत वाईट घटना आहे. नाना हा माझा जिवलग मित्र होता. जीवाभावाचा मित्र अचानक आपल्याला सोडून जाण्यानं होणारं दुःख शब्दांतून परिपूर्ण व्यक्त कधीच होऊ शकत नाही. नाना आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. त्याच्याबरोबरचा सहवास, त्याचा स्वभाव, त्याच्या आठवणी या साऱ्यांचा पट डोळ्यांसमोर येत आहे. नाना अशा रीतीने अचानक सर्वांना चटका लावून निघून जाईल, असं कधी वाटलंही नव्हतं.

नाना आणि माझ्या मैत्रीची सुरुवात अभिनयाच्या क्षेत्रातूनच झाली. 1978 सालची गोष्ट. त्यावेळी आम्ही विजयाबाईंच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो. नाना तेव्हा या क्षेत्रात नवखा होता. अभिनयाच्या क्षेत्रात त्याची ओळख निर्माण व्हायची होती. मात्र ‘हमीदाबाईची कोठी’मध्ये त्याने जी भूमिका केली, ती विलक्षण होती. त्याने आपल्या भूमिकेला अशा प्रकारे खुलवलं की, त्याचं नाव लगेच सर्वत्र पोहोचलं. नाना पाटेकर नावाचा एक नवीन आणि ताकदीचा अभिनेता रंगभूमीवर आला आहे, याची दखल घेतली जाऊ लागली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

या नाटकाच्या निमित्तानं आमचा साधारण आठ महिने जवळून सहवास आला. त्या काळात मला नाना खऱ्या अर्थाने समजला. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा. आमच्या स्वभावात फरक होता, पण त्यामुळे आमच्या मैत्रीत कधी अडचण आली नाही. नाना स्पष्ट बोलायचा. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा असा त्याचा स्वभाव होता. एखादी गोष्ट पटली नाही तर तो लगेच सांगायचा. मनात एक आणि ओठांवर दुसरं, असं त्याचं कधीच नसायचं.

नानाबरोबरच्या अनेक आठवणी आहेत. त्यातला एक प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ‘हमीदाबाईची कोठी’च्या दौऱ्यावर असताना आम्ही एका गावात गेलो होतो. तिथे नाटकाचा प्रयोग होता. व्यवस्थित नाट्यगृह नव्हतं. एका गिरणीच्या जागेत प्रयोगाची व्यवस्था केली होती. प्रेक्षकांसाठी खुर्च्या लावल्या होत्या. मात्र रंगमंचाची व्यवस्था योग्य नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांना नाटक नीट दिसत नव्हतं. हळूहळू प्रेक्षक नाराज झाले. गोंधळ सुरू झाला. काहींनी खुर्च्यांची मोडतोड सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि नाटकाचा प्रयोग थांबवावा लागला. त्या गोंधळात आम्ही कलाकार अडकलो होतो. बाहेर पडणं कठीण झालं होतं. जमाव संतप्त झाला होता. अशा वेळी नानाने प्रसंगावधान राखलं. त्याने मला तिथून बाहेर काढण्याचं ठरवलं. आम्ही मागच्या बाजूने बाहेर पडलो. अंधारातून पळत सुटलो. वाटेत गटारही ओलांडावं लागलं. नानाने एक हातरिक्षा मिळवली. मला त्यात बसवलं आणि स्वत: ती रिक्षा ओढत तो मला रेस्ट हाऊसवर घेऊन गेला. मला सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतरही तो स्वस्थ बसला नाही. इतर कलाकारांचीही त्याने व्यवस्था केली. अखेर रात्री तीनच्या सुमारास पोलिसांच्या संरक्षणात आम्ही त्या गावातून बाहेर पडलो. त्या दिवशी नाना नसता तर माझं काय झालं असतं, याची कल्पनाही करवत नाही. त्याने अक्षरश माझा जीव वाचवला होता. तो प्रसंग आठवला की, नानाचं ते रूप डोळ्यांसमोर उभं राहतं.

नानाच्या स्वयंपाकाची आणि जेवू घालण्याच्या आवडीची आठवण काढल्याशिवाय त्याच्याविषयी बोलणे पूर्णच होऊ शकत नाही. नाना उत्तम स्वयंपाक करत होता हे आज चित्रपटसृष्टीला ठाऊक आहे; पण त्याची ही आवड अगदी संघर्षाच्या काळापासूनची होती. नाटकांच्या दौऱ्यावर असताना किंवा मुंबईतील दिवसांमध्ये नानाने स्वत:च्या हाताने रुचकर मांसाहारी आणि शाकाहारी जेवण बनवून कितीतरी वेळा तृप्त केले. तो जितक्या उत्कटतेने अभिनय करायचा, तितक्याच तन्मयतेने आणि मायेने तो लोकांना जेवू घालायचा, हे मी कायम अनुभवले आहे. जेवणाच्या पंगतीत नानाचा जो आग्रही आणि प्रेमळ स्वभाव दिसायचा, तो त्याच्या बाह्य रागीट प्रतिमेला पूर्णपणे छेद देणारा असायचा.

आज नाना आपल्यात नाही. त्याच्या कितीतरी आठवणी मनात आहेत. नानासारखी माणसं पुन्हा भेटणं कठीण असतं. संघर्षाच्या दिवसांत थकून आल्यावर मित्राचे पाय चेपणारा, संकटाच्या क्षणी रिक्षाचे हँडल हातात धरून माझा जीव वाचवणारा, अतिशय प्रेमाने जेवण वाढणारा आणि यशाची कसलीही हवा डोक्यात न जाऊ देणारा तो एक खराखुरा, सच्चा माणूस म्हणून माझ्या मनातील नानाचे स्थान सदैव कायम राहील.

(शब्दांकन: विधिषा देशपांडे)