
महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर शनिवारी दुपारी साडे तीन वाजता आंदोलनासाठी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार गांधी यांनी पोलीस गाडीतून जात असताना व्हिडीओ रेकॉर्ड करत शेअर केला आणि याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी मला ताब्यात घेतले असून डीएन नगर पोलीस स्थानकात घेऊन जात आहेत. पोलिसांनी मला नॅशनल कॉलेजमधून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वांद्रे पोलीस किंवा सांताक्रूझ पोलीस स्थानकाला न नेता डीएन नगर पोलीस स्थानकात नेत आहेत. तिथे माझ्यासाठी खास व्यवस्था केली असण्याची शक्यता आहे, असे तुषार गांधी म्हणाले.
पोलीस सत्तेचे गुलाम आहेत. सत्ताधाऱ्यांची चाकरी करत आहेत. एक दिवस सत्ताबदल होईल आणि त्यानंतर सर्वांचा हिशेब होईल, असेही तुषार गांधी म्हणाले. याचा व्हिडीओ त्यांनी स्वत: रेकॉर्ड करून शेअर केला आहे. यात ते पोलिसांच्या गाडीमध्ये बसल्याचे दिसून येत आहे.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, पोलीस गाडीतून व्हिडीओ शेअर करत दिली माहिती https://t.co/MnuMqQLCvF
— Saamana Online (@SaamanaOnline) October 10, 2026
दरम्यान, आम्हाला ताब्यात घेतले असले तरी आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. आज दुपारी सर्वांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर पोहोचावे, असे आवाहन यावेळी तुषार गांधी यांनी केले. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


























































