नवरात्रोत्सवासाठी करवीरनगरी सज्ज, मंदिरांवर विद्युत रोषणाई; आज घटस्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या करवीरनगरीत आज पारंपरिक रीतिरिवाजात घटस्थापनेपासून रविवारी (दि. 11) शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. घरोघरी तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही याची सर्वतोपरी जय्यत तयारी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दरवर्षी दररोज लाखो भाविकांची उपस्थिती पाहता, यंदाही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरातही नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे.

नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई देवीची अलंकृत पूजा

शारदीय नवरात्र उत्सव रविवारपासून (दि. 11) ते मंगळवार (दि. 20) या कालावधीत संपन्न होत आहे. यंदाही नवरात्रोत्सवाच्या काळात श्री अंबाबाई देवीची दररोज श्री पूजकांकडून विविध रुपांत अलंकृत पूजा बांधण्यात येणार आहे.

रविवारी (दि. 11) अश्विन शुक्ल प्रतिपदेला पहिल्या दिवशी श्रीनंदादेवी, सोमवारी द्वितीयेला श्री सर्वस्याद्या, मंगळवारी तृतीयेला श्रीभीमादेवी, बुधवारी चतुर्थीला श्रीकात्यायनी, गुरुवारी पंचमीला गजारूढ अंबारीतील पूजा, शुक्रवारी षष्ठीला देवी स्कंदमाता, शनिवारी सप्तमीला देवी वैष्णवी, रविवारी सप्तमीला त्रिगुणात्मिका महालक्ष्मी, सोमवारी अष्टमीला महिषासूरमर्दिनी, तर मंगळवारी (दि. 20) नवमी/दशमी दिवशी अश्व रथारूढ पूजा बांधण्यात येणार असल्याची माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर यांनी दिली.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवारी श्री अंबाबाई देवीची सालंकृत पंखा पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्रीपूजक नितीन मुनिश्वर यांनी बांधली होती.