मुंबईत मंगळवारपर्यंत उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यातून मान्सूनने एक्झिट घेतल्यानंतर आता सूर्य आग ओकू लागला आहे. मुंबईत पारा 38 अंश सेल्सिअसवर गेला असून मंगळवारपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तीन दिवसांनंतर उष्णतेची लाट थांबणार असली तरी पारा 35 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंतच राहणार असून निरभ्र आकाशामुळे उकाडा मात्र जाणवणारच असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातही हीच स्थिती असून उष्ण व दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. कोकण विभागातही उष्णता वाढली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिह्याला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. सिंधुदुर्गात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असली तरी तापमान मात्र 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याने उकाडा जाणवणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्ट्रातही धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिह्यात हवामान कोरडे राहणार आहे. या ठिकाणी तापमान 33 अंश सेल्सिअस राहणार असले तरी प्रखर ऊनामुळे उकाडा जाणवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागात तापमान 32 अंश सेल्सिअस राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पूर्वेकडून येणाऱया उष्ण आणि कोरड्या वाऱयांमुळे समुद्राकडून येणाऱया वाऱयांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे मुंबईत उकाडा वाढला आहे. अजून दोन ते तीन दिवस हीच स्थिती राहणार असून त्यानंतर काहीसे तापमान कमी होईल. मात्र पारा 35 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंतच राहील. – सुषमा नायर, मुंबई हवामान विभाग

विदर्भ तापला; पारा 40 अंशांवर

विदर्भात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचल्याने नागरिकांना अक्षरशः चटके सहन करावे लागत आहेत. नागपुरात 36 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले आहे. वाढत्या उकाड्याची स्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रखर उन्हात घराबाहेर पडू नये आणि ऊनापासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.