श्रेयसच्या नेतृत्वावर गावसकर नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱया सामन्यानंतर माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सामन्यात हिंदुस्थानला 249 धावांचा बचाव करता आला नाही आणि सामना गमवावा लागला. त्यानंतर गावसकर यांनी श्रेयसच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.

पराभवानंतर गावसकर यांनी हिंदुस्थानच्या गोलंदाजी निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, ‘पाहुण्या संघाच्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना 17 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी अर्शदीप सिंग किंवा मयंक यादव हे अधिक चांगले पर्याय ठरले असते. मी अर्शदीप किंवा मयंक या दोघांपैकी एकाची निवड केली असती.  मयंकने सुरुवातीलाच धक्के दिले. तीन विकेट्स त्याने घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटक सुमारे 12 होता आणि त्यावेळी वेस्ट इंडीजला त्यापेक्षा जास्त धावांची गरज होती. त्यामुळे जर त्याने विकेट घेतली असती तर सामना तुमच्या बाजूने फिरू शकला असता. अर्शदीपनेही चांगली गोलंदाजी केली होती, त्यालाही हे 17 वे षटक देता आले असते. पण श्रेयसने तसे केले नाही.’

दुबेला नववे षटक टाकण्याची गरज नव्हती

गावसकर यांनी नवव्या षटकात शिवम दुबेला गोलंदाजी देण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, ‘त्यावेळी कुलदीप यादव हा एक चांगला पर्याय ठरला असता. एकदा विकेट पडली की विरुद्ध संघ अचानक बॅकफूटवर जातो. एका नवीन फलंदाजाला मैदानात यावे लागते. कदाचित तसा प्रयत्न करता आला असता. मला वाटते की, त्यावेळी नवव्या षटकात शिवम दुबेला चेंडू देणे योग्य नव्हते. जेव्हा फलंदाज परिस्थितीचा अंदाज घेत होते तेव्हा कदाचित कुलदीपला गोलंदाजी देणे अधिक चांगले ठरले असते.’