
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर येथील श्री रेणुका माता गडावर आज, दि. ११ सप्टेंबर रोजी परंपरेनुसार नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर ‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात पहिल्या माळेच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली.
टीव्ही वाद्यवृंदातील प्रसिद्ध सनईवादक नितीन धुमाळ व संच (नाशिक) यांच्या सनईच्या मंगलमय सुरांत, तसेच वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी, अनिल काण्णव, मनोज बनसोड यांच्या पौरोहित्याखाली आणि वेदशाळेतील शिष्यांच्या सहभागाने मुख्य देवता श्री रेणुका मातेची वैदिक महापूजा करण्यात आली. यावेळी अभिषेकाची सहस्र आवर्तने करण्यात आली. गणेशपूजन, कलशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, ऋग्वेद पारायण आणि शतसूक्त पारायण असे धार्मिक विधी पार पडले.
मातृतीर्थावरून कलशात आणलेल्या तीर्थाने भवानीदास भोपी, शुभम भोपी आणि विनायक यांच्या हस्ते देवीला स्नान घालण्यात आले. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करण्यात आला. देवीला काजळ लावून शृंगार करण्यात आला. पुरातन अलंकार धारण करून पुष्पहारांनी सजविण्यात आले. तसेच देवीला पिवळ्या आंबा रंगाची पैठणी व महावस्त्र परिधान करण्यात आले.
श्री रेणुका माता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील पाषाणाच्या कुंडात मातृका भरून त्यामध्ये सप्तधान्य टाकण्यात आले. कुंडावर मातीचा कलश ठेवून त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ ठेवण्यात आले. कलशाभोवती उसाचे पाच धांडे उभारण्यात आले. त्यानंतर कलशावर पुष्पहाराची पहिली माळ चढविण्यात आली.
सकाळी ११.३० वाजता सहायक धर्मादाय आयुक्त तथा संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष हिरा शेळके, तहसीलदार अभिजीत जगताप आणि विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव व दुर्गादास भोपी यांच्या हस्ते घटस्थापना करून आरती करण्यात आली. यावेळी कुमारिका पूजनही करण्यात आले. दुपारी १ वाजता पायस नैवेद्य, गायीचे तूप आणि श्री मातेला महानैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील परिवार देवतांचे पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि आरती करण्यात आली.
मंदिरात अखंड तेवत राहणाऱ्या नंदादीपाचे पूजन आणि सुवर्णालंकार पूजन करण्यात आले. तसेच श्री दुर्गासप्तशती शतचंडी पाठाचा संकल्प करून पाठास सुरुवात करण्यात आली. चतुर्वेद पारायणालाही प्रारंभ झाला. पायस नैवेद्य अर्पण, छबिना आणि परिवार देवतांचे पूजन आदी धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी परशुराम मंदिर परिसरात महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले.
प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत मंदिरात देवीसमोर अखंड नंदादीप तेवत ठेवण्यात येतो. दररोज देवीला पायस म्हणजेच दहीभात आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. आरतीनंतर छबिना मिरवणूक काढण्यात येते. रेणुका माता ज्या गडावर प्रकट झाली, त्या गडाला प्रदक्षिणा घालून छबिना पुन्हा रेणुका माता मंदिरात आणण्यात येतो.
भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त
नवरात्रोत्सवासाठी गडावर जाणाऱ्या रस्त्यांवरील टी-पॉइंट आणि मुख्य रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. खासगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने 120 बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायत आणि दत्त शिखर संस्थानच्या वतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके हे आपल्या कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवत आहेत.




























































